सोलापूर
पर्यटन

तुळशी वृंदावन

गावाचे नाव : पंढरपूर
तालुका : पंढरपूर

पंढरपूर हे भू-वैकुंठ मानले जाते. आळंदी हे ज्ञानपीठ, कोल्हापूर हे शक्तीपीठ तसे पंढरपूर हे भक्तीपीठ आहे. अनेक संतांनी आपल्या अभंगांमधून पंढरीचे अनन्यसाधारण महत्त्व विषद केले आहे. पंढरीचा पांडूरंग, चंद्रभागा, भक्त पुंडलीक, संत जनाबाई या अनेक संतांनी पंढरीचा महिमा गायला आहे. अशा या संतांच्या वर्णनातून नाणावलेल्या पंढरपूरमध्ये टाकळीचा ओढा होता. स्थानिक स्वराज्य संस्थेने पंढरपूरच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी इ.स. १८७४ मध्ये ओढ्याला अडवून तलाव तयार केला आहे. हा तलाव यमाई तलाव म्हणून ओळखला जातो. यामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती, पक्षी, शेवाळे आणि जलचर यांची विविधता आढळते. याच तलावाच्या पश्चिमेला असलेल्या जागेमध्ये तुळशी वृंदावन उद्यानाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

पंढरीचा पांडुरंग हा कृष्णाचा अवतार समजला जातो, कृष्णाला अत्यंत प्रिय असणारी वनस्पती म्हणजेच तुळस. तुळशीला वारकरी सांप्रदायामध्ये खूपच महत्त्व आहे. तुळशीचे भक्तीभावाने जसे वर्णन सापडते, तसे तुळशीला विज्ञानाच्या कसोटीवर देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक प्रकारचे त्वचा रोग, काही असाध्य रोगांवर तुळस गुणकारी असल्याचे आयुर्वेद सांगतो. वारकरी या तुळशीचे रोपटे प्रत्येक दिंडीमध्ये मस्तकावर घेऊन नाचतात. वारकरी संप्रदायामध्ये टाळ, वीणा, पताका यांच्याबरोबरच तुळशीलादेखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक वारकर्याच्या गळ्यामध्ये तुळशीच्या मण्यांची माळ असते. पांडुरंगालाही तुळशीची माळ आवर्जून घातली जाते.

पंढरीची भक्तीपीठ म्हणून असलेली महती आणि पांडूरंगाचे तुळशीबरोबर असलेले जिव्हाळ्याचे नाते यांचा सुंदर मिलाफ करून या तुळशीच्या उद्यानाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या उद्यानात आठ प्रकारच्या तुळशींची लागवड करण्यात आलेली आहे. त्याचसोबत प्रसिद्ध अशा आठ संतांच्या सुंदर अशा मुर्तींचीही स्थापना करण्यात आलेली आहे. उद्यानाच्या भिंतींवर सर्वपरिचीत अशा संतांची चित्रे व त्यांच्या आयुष्यातील घटना चितारण्यात आलेल्या आहेत

Scroll to Top